जनता दरबार उपक्रमाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून विशेष दखल
मुंबई, दि. ६: जनता दरबार च्या माध्यमातून अडचणीत असलेल्या लोकांच्या समस्या सोडवणार्या नितिन नांदगावकर यांच्या कामाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर दखल घेत त्यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. या संबंधी ची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नितिन नांदगावकर यांनी मनसेतील अंतर्गत राजकारणाला वैतागून शिवसेना या आपल्या पूर्वाश्रमीच्या पक्षात घरवापसी केली. मनसेत असताना लोकांवर होणार्या अन्यायाला फेसबूक लाईव च्या माध्यमातून वाचा फोडण्याच्या नव्या ट्रेंड चे त्यांना जनक म्हणण्यास हरकत नाही. कारण यानंतर मनसेसह इतर राजकीय पक्षाच्या अनेक पदाधिकार्यांनी-कार्यकर्त्यांनी याच पद्धतीने कधी लाईव फटकेबाजी करत तर कधी दम देत अनेक विषय मांडले. शिवसेनेत आल्यावर नितिन नांदगावकर यांनी थेट शिवसेना भवनात आपला जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली. ज्यात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने तक्रारदाराचे निवेदन स्वीकारत न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत.
