धनुष्यबाण कोणाचा ! दावा सांगण्यासाठी शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगासमोर निवेदन दाखल
मुंबई, दि. ८ : ‘धनुष्य बाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाने काल आणि आज निवडणूक आयोगाकडे त्यांची बाजू मांडली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे दिली असून आणखी अडीच लाखांहून अधिक पक्ष सदस्यांची प्रतिज्ञापत्र जमा करु असं ठाकरे गटाचे वकिल अॅडव्होकेट सनी जैन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासोबतच १० ते १५ लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्जही जमा केले जातील. त्यासाठी ४ आठवड्यांचा कालावधी मागितल्याचं जैन यांनी सांगितलं.
अंधेरी पूर्व मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी द्यावी असा अर्ज शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे मंगळवारी केला होता. त्यावर ठाकरे गटानं त्यांची बाजू मांडली आहे. शिंदे गट अंधेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार उभा न करताही ‘धनुष्यबाण’ ही निशाणी का मागतोय हे मोठं कोडं असून याबाबत शिवसेना नेते खा. अरविंद सावंत यांनीही शिंदे गटाला सवाल केला आहे.
