मराठी साहित्यविश्वातील प्रतिभावान लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांचं निधन
मुंबई, दि. २५: ज्येष्ठ लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. आज मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेमा, क्रिकेट, राजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या टोकदार आणि नर्मविनोदी शैलीने ठसा उमटवला होता. वन मॅन स्टँडअप टॉक शो म्हणजेच संवादात्मक एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातूनही त्यांना लोकप्रियता मिळाली. यादों की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूर पारंब्या, कणेकरी, लगाव बत्ती, आसपास, मेतकूट, चित्ररुप, फिल्लमबाजी अशी त्यांची अनेक सदरं वाचकांच्या स्मरणात आहेत. याच सदरांमधल्या त्यांच्या लेखांचे संग्रह पुस्तकरुपानेही प्रसिद्ध झाले आहेत. त्याशिवाय क्रिकेट वेध, आणि ते साठ दिवस. डॉलरच्या देशा ही त्यांची प्रवासवर्णनं ही प्रसिद्ध झाली आहेत. कणेकरी, माझी फिल्लमबाजी आणि फटकेबाजी या प्रयोगातून त्यांनी मराठीत वन मॅन स्टँडअप टॉक शो हा प्रकार प्रथम सुरु केला. इंडियन एक्सप्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल इत्यादी वर्तमानपत्रांसाठी त्यांनी इंग्रजीतून वार्तांकन केलं. कारकिर्दीची सुरुवात वार्ताहर म्हणून करणाऱ्या कणेकरांची लेखणी नंतर ललित लेखनात रमली. प्रसिद्धीच्या झोतातल्या मान्यवरांना सर्वसामान्य वाचकांच्या भावविश्वात अगदी निकटचं स्थान मिळवून देणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य होतं.
Source – AIR
