दिपक केसरकर प्रवक्तेपदी तर रामदास कदम व आनंद अडसूळ यांची नेतेपदी निवड
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या ना त्या प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न शिंदे गट व त्यांच्याआडून भाजप करताना दिसत आहे. आधी सत्तांतर केलं गेलं आणि त्यानंतर शिंदे गटाकडून पक्षावर दावा सांगितला गेला. आता एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे गटाने जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली आहे. (प्रति)शिवसेनेच्या प्रमुख नेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख पदाला तूर्तास हात लावलेला नाही. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंखे, तानाजी सावंत, विनय नाहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय, मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये प्रति)शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बैठकीत शिवसेनेचे १३-१४ खासदार ऑनलाइन हजर झाल्याचेही सूत्रांच्या हवाल्याने वृत्त आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच शिवसेनेचे ५५ आमदार दोन गटात विभागले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या शिबिराला ४० आमदारांचा पाठिंबा आहे, तर १५ आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्याचवेळी आता शिंदे गटाने १२-१४ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे.
