“कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्या” – खा. शरद पवार यांची केंद्र सरकारला विनंती
मुंबई/नवी दिल्ली: केंद्र सरकारने काल कांदा निर्यात बंदीची तडकाफडकी घोषणा केली. या घोषणेनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही या संदर्भात केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांना या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती केली.
या बाबत ट्विट करत ते म्हणाले, “केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली व विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली.”
“वरील विनंतीला अनुसरून केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल यांनी सांगितलं की, हा कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर आला आहे.” पुढे ते म्हणाले की, “या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही या निर्यातबंदीचा फेरविचार करू व जर एकमत झाल्यास याबाबतीत पुनर्निर्णय घेऊन असं मा. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं.
आज जवळपास सर्व पक्षांनी कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन पुकारलं आहे.
