शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस
मुंबई, दि.२२: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. मागील काही वर्षांतील निवडणुक पत्रांबाबत स्पष्टीकरण मागवण्यासाठी ही नोटीस पाठवल्याचे कळते. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी देशातील इतर सदस्यांपैकी नेमकी आपल्यालाच नोटीस आल्याबद्दल आनंद होत असल्याचा टोला लगावला.
ते म्हणाले की, “नोटीस आधी मला आली, आता सुप्रियाला येणार आहे असं कळलं, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली. त्याचं उत्तर लवकरच मी देईन.” शरद पवार यांना आयकर विभागाकडून आलेली नोटीस ही सूडभावनेपोटी पाठवल्याची राजकीय पटलावर दबक्या आवाजात चर्चा आहे.
