आज दुपारी शरद पवार हजर होणार ईडी च्या कार्यालयात, परिसरात चोख पोलीस बंदोबस्त
मुंबई: शिखर बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज ‘ईडी’ च्या कार्यालयात चौकशी होणार आहे. आज दुपारी २ वाजता ते ईडी च्या मुंबईतील कार्यालयात हजर राहणार आहेत.
तत्पूर्वी काल शरद पवार यांनी ट्विट करत आपल्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी.”
ते पुढे म्हणाले की, “त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे.”
काही दिवसांपूर्वी याच कार्यालयात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही चौकशी करण्यात आली होती. यानंतर थेट शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला ‘ईडी’ च्या कार्यालयात पाचारण करण्यात येत आहे.
