राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबतही मांडले मत
मुंबई, दि. १८: जी काही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्यासंबंधी कोणीतरी काम करतंय यापेक्षा त्याला काही अर्थ नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी माध्यमांवरील वृत्ताबाबत पवार यांनी आपली भूमिका मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सांगायचे झाले तर आमचा पक्ष आणि पक्षात काम करणारे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसे करायचे या भूमिकेत आहेत. त्यापेक्षा दुसरा कोणताही विचार कोणाच्याही मनात नाही. बातम्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक असल्याचे वाचनात आले. मात्र ही शंभर टक्के खोटी गोष्ट आहे. अशी कोणतीही बैठक कोणीही बोलवलेली नाही. मी यासंदर्भात कोणतीही बैठक बोलवलेली नाही. यानंतर माझा देहू येथे कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री मुक्कामासाठी मी मुंबईला रवाना होईन. प्रदेशाध्यक्ष सध्या त्यांच्या भागात मार्केट कमिटीच्या निवडणूक प्रचारात आहेत. अजित पवार देखील या कामात आहेत. ते त्यांच्या कामात गुंतलेले आहेत. तसेच मी माझे ठरलेले कार्यक्रम करत आहे, असे पवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडी बाबत ते पुढे म्हणाले की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि मी असे आम्ही एकत्रित भेटलो होतो. त्यासंदर्भात वेणुगोपाल हे उद्धव ठाकरे आणि मला भेटण्यासाठी मुंबईला येणार होते. देशपातळीवर विरोधकांची बैठक व्हावी आणि काही कार्यक्रम तयार करावा याची चर्चा करण्यासाठी तसेच या बैठकीचे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. माझी खात्री आहे की ठाकरे आणि राज्यातील आम्ही सर्वजण राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहू. यासंदर्भात असलेल्या सामूहिक कार्यक्रमात आम्ही सर्व सहभागी असू, अशी माहिती शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
*संग्रहीत छायाचित्र
