मसुरे (आंगणेवाडी) लघु पाटबंधारे प्रकल्पास २२ कोटी ११ लाखांची प्रशासकीय मान्यता – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची माहिती
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे (आंगणेवाडी) येथील नाल्यावर प्रस्तावित असलेल्या लघु पाटबंधारे योजना मसुरे (आंगणेवाडी) या प्रकल्पास २२ कोटी ११ लक्ष ८८ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
मंत्री गडाख म्हणाले, मसुरे (आंगणेवाडी) भागात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासत होती. या योजनेमुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रकल्प मार्गी लागणार असून यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पाचा शासन निर्णय निर्गमित केलेला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कार्यादेश देण्यात येणार असून प्रत्यक्ष कामास सुरवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मालवण तालुक्यातील मसुरे (आंगणेवाडी) या योजनेची एकूण साठवण क्षमता 985 सघमी इतकी आहे. या प्रकल्पांतर्गत 80 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पाणलोट क्षेत्र 1.24 चौरस किलोमीटर आहे. पन्नास टक्के विश्वासार्ह पर्जन्यमान 119.10 तर पन्नास टक्के विश्वासार्ह पाण्याची आवक 2810.61 सघमी इतकी असणार आहे. या मातीच्या धरणाची लांबी 266 मीटर व उंची 26.61 मीटर असणार आहे, अशी माहिती मृद व जलसंधारणमंत्री गडाख यावेळी दिली.
