शालिनी ठाकरे यांच्याकडून उर्मिला मातोंडकर यांना फेसबुकद्वारे ‘मनसे’ शुभेच्छा!
मुंबई: बॉलिवूडमधील मराठामोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर आज मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शालिनी ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून उर्मिला मातोंडकर यांचे कौतुक केले असून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे.
शालिनी ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, स्वतःतील अंगभूत अभिनय गुणांच्या जोरावर एक अभिनेत्री म्हणून तू स्वतःचा स्वतंत्र ठसा बॉलीवूडवर उमटवलास. अनेक उत्तमोत्तम सिनेमे तुझ्या वाट्याला आले आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं तू सोनं केलंस.
आज काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून तुझं नाव जाहीर केलंय. राजकारणात सक्रिय होण्याचा हा निर्णय तू निश्चितच संपूर्ण विचारांती घेतला असशील. या निवडणुकीच्या निमित्ताने तुझ्यासारखं एक संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणात आल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे.
महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना-समस्यांना आवाज फोडण्यासाठी तुझ्यामुळे मदत होईल, याची खात्री आहे.
तुझ्या या नव्या इनिंगला ‘मनसे’ शुभेच्छा! अशा शब्दात सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बुधवारी उर्मिला यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई उत्तर मतदारसंघात उर्मिला यांची लढत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत होणार आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2255749224673108&id=100007141566321
