कॉंग्रेस ची कार्यकर्त्यांनी केला मोदी सरकारचा निषेध
मुंबई, दि. ६: अडाणी समूहावरील आर्थिक फसवणुकीच्या आरोपावरून काँग्रेस पक्षाने सोमवारी रस्त्यावरून संसदेपर्यंत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेत्यांनी संसद संकुलातील गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली. त्याचवेळी देशव्यापी निषेधाचा भाग म्हणून काँग्रेसतर्फे मुंबईतही आंदोलन करण्यात आले. अडाणी प्रकरणाबाबत काँग्रेसच्या वतीने मुंबईतील एसबीआय कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. काल दि. ५ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी घोषणा केली होती की, ६ फेब्रुवारीला काँग्रेस पक्ष देशभरातील एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करेल.

खरे तर काँग्रेसचे म्हणणे आहे की, या गोंधळामुळे अडाणी समूहाच्या शेअर्सच्या घसरणीचा परिणाम सर्वसामान्यांवर होईल. कारण एसबीआय आणि एलआयसी ने ही यात गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, अडाणी समूहाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्यांना संसदेत एक मिनिटाचाही वेळ देण्यात आला नाही. सरकार या प्रश्नावर जाणीवपूर्वक मौन बाळगून आहे. यावर विरोधकांना मोदी सरकारकडून उत्तर हवे आहे. त्याचबरोबर अनेक खासदारांनी संसदेत कामकाज स्थगन प्रस्ताव मांडून या मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी अनेक दिवसांपासून मोदी सरकारवर अडाणी समूहाबाबत विविध आरोप करत आहेत.
