संजय राऊत यांच्या कोठडीत येत्या २२ ऑगस्ट पर्यंत वाढ
मुंबई, दि. ८ : पत्रा चाळ प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे.
यावेळी संजय राऊत यांच्या वकिलाने घरचे जेवण देण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्या वकिलाने त्यांची वैद्यकीय कागदपत्रे न्यायालयाला दाखवली, त्यावर न्यायालयाने राऊत यांना तुरुंगात औषध आणि घरी शिजवलेले अन्न देण्याचे मान्य केले. त्यांच्या वैद्यकीय पेपरमध्ये शिवसेनेचे खासदार हृदयरोगी असल्याचे म्हटले आहे.
पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या तक्रारीवरून राऊत यांना न्यायालयाने ८ ऑगस्ट पर्यंत ईडीच्या ताब्यात दिलं होतं. या काळात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची देखील पत्रा चाळ प्रकरणी चौकशी केली. राऊत यांची कोठडी वाढवावी अशी ईडीने मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने आज हा निर्णय दिला.
