पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचे मंत्रिपद काढून घेतले होते
मुंबई, दि. ९ : बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर झाला असून शिंदे गट व भाजपच्या एकूण १८ मंत्र्यांचा शपथविधी थोड्याच वेळापूर्वी पार पडला. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शिंदे गट व भाजपच्या ९-९ आमदारांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शिंदे गटातील अपक्ष आमदारांचा विशेषतः बच्चू कडू यांचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होईल अशी अटकळ होती. परंतू, तसे काही घडले नाही. याच सोबत शिंदे यांचे खंदे समर्थक महाड चे आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, संजय शिरसाट आदी प्रमुख नेत्यांना नारळ मिळाल्याचे सध्यातरी चित्र आहे.
याच वेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गोत्यात आलेले संजय राठोड यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागल्याचे पाहायला मिळत आहे. गत वर्षी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. आज राठोड यांचा शपथविधी झाल्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही आपल्या संतापाला वाट मोकळी करीन देताना कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. याच सोबत टीईटी घोटाळ्यात काही आरोप असलेले सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांनाही मंत्रिपद मिळाले आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडात अग्रणी असलेले संजय शिरसाट मात्र उपेक्षित राहिल्याचे सध्याचे चित्र आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात सारंच आलबेल आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल.
जाणून घ्या शपथविधी झालेल्या सर्व मंत्र्यांची नावे
भाजप
१. राधाकृष्ण विखे पाटील
२. गिरीश महाजन
३. सुधीर मुनगंटीवार
४. चंद्रकांत पाटील
५. मंगलप्रभात लोढा
६. सुरेश खाडे
७. रविंद्र चव्हाण
८. अतुल सावे
९. विजयकुमार गावित
शिंदे गट
१. अब्दुल सत्तार
२. संजय राठोड
३. उदय सामंत
४. संदीपान भुमरे
५. तानाजी सावंत
६. शंभुराजे देसाई
७. गुलाबराव पाटील
८. दीपक केसरकर
९. दादा भुसे
