१ ऑगस्ट रोजी ईडी कडून करण्यात आली होती अटक
मुंबई, दि. ९: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली व अखेर तब्बल १०० दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाला. आज संध्याकाळी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना १ ऑगस्ट रोजी अटक केली होती. तुरुंगातून बाहेर येताना ते आपल्या जुन्या अंदाजात दिसले. त्यांनी तुरुंगाबाहेर उभ्या असलेल्या समर्थकांना हात हलवून अभिवादन केले. याच सोबत त्यांनी भगवा हवेत फडकावत आपण अजून लढण्याच्या मूड मध्येच आहोत याचा विरोधकांना इशारा दिला.
राऊत यांची सुटका झाल्यानंतर लगेचच शिवसैनिकांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर फटाके फोडून एकमेकांवर गुलालाची उधळण केली. यासोबतच संजय राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. संजय राऊत १०० हून अधिक दिवस तुरुंगात होते.
