मतदानासाठी सदाशिव ने थेट ऑस्ट्रेलिया वरून गाठली मुंबई…सलाम अशा मतदारांना
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्याच्या निवडणुकीची वेळ संपायला काहीसाच अवधी बाकी आहे. महाराष्ट्रातल्या १७ लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर आज उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अगदी १८ वं वर्ष नुकतंच लागलेली तरुणाई असो की ८० वर्षांचे आजी-आजोबा असोत, या सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मतदान केल्यावर सेल्फी काढून तो फोटो फेसबुक व व्हाट्सअप्प च्या स्टेटस वर टाकण्याची जणू स्पर्धाच लागली होती. त्याच बरोबर ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना टॉन्ट मारले जात होते. पण हे झालं इथल्याच मतदारांबद्दल ज्यांना या कामासाठी ऑफिस कडून सुट्टीही मिळाली. पण ज्यांचं नाव मतदार यादीत आहे पण ते कामानिमित्त परदेशात आहेत त्यांच तर मत बुडालं ना? थांबा ! आज अशाही काही मतदारांनी सात समुद्र पार करून मतदान केंद्र गाठलेलं आहे बरं का. अशातलंच एक नाव म्हणजे सदाशिव भिडे (फोटोत निळं T-शर्ट). पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले सदाशिव गेले ८ वर्ष कामानिमित्त ऑस्ट्रेलिया राहतात. पण कामाच्या व्यापात त्यांनी आपल्या भारतीयत्वाची आठवण जागृत ठेवली आहे. विशेष म्हणजे ते चक्क मतदानासाठी थेट ऑस्ट्रेलिया वरून भारतात आले. आज सकाळी त्यांनी माटुंगा येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला व आपलं कर्तव्य पार पाडलं. त्यांना टीम महाराष्ट्र वार्ता तर्फे हॅट्स-ऑफ. पण एका बाजूला इथेच वास्तव्यास असलेले सुजाण? मतदार आपला मतदानाचा हक्क न बजावता मिळलेल्या सुट्टीचा आस्वाद घेत घरीच लोळत पडलेले आहेत किंवा बाहेर फिरलाय तरी गेलेले आहेत. त्यांच्या बद्दल काय बोलावं? मतदानाची टक्केवारी ही सरासरी ६० टक्क्यांच्या वर जात नाही. या पेक्षा मोठी शोकांतिका ती कोणती? विचार करा…!
