“माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही” – खा. सुप्रिया सुळे
मुंबई, दि. ०१: माणिकराव कोकाटे यांचा रमीचा डाव खेळतानाचा व्हीडीओ सबंध राज्याने बघितला. यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. माणिकराव कोकाटेंना कृषी खात्याचा राजीनामा द्यावा लागेल अशी शक्यता होता. परंतु, आज या साऱ्या शक्याता शक्यताच राहिल्या. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खातेबदल झाला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना आता युवा, क्रीडा आणि औकाफ खातं मिळालं असून दत्तात्रय भरणे आता कृषीमंत्री असतील. माणिकराव कोकाटे आक्षेपार्ह वक्तव्यांसह रम्मीचा डाव खेळणे सह विविध कारणांसाठी वादात सापडले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्या म्हणाल्या कि, “राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे.
महाराष्ट्र शासनाला ‘भिकारी’ म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली. एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे.
