७५ हजार वायलची पहिली खेप आज भारतात पोहोचणार
मुंबई, दि.३०: अत्यावश्यक अशा रेमडिसीवीर औषधाची देशातील कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने इतर देशांकडून रेमडीसीवर आयात करायला सुरुवात केली आहे. ७५,००० वायलची पहिली खेप आज भारतात पोहोचेल.
भारत सरकारच्या मालकीच्या एचएलएल लाइफकेयर लिमिटेड या कंपनीने अमेरिकेतील मेसर्स गिलियड सायन्सेस आणि इजिप्शियन औषध कंपनी मेसर्स ईवा फार्माकडून रेमडिसीवीरच्या ४,५०,००० वायल मागवल्या आहेत. गिलियड सायन्सेस आयएनसी, यूएसए पुढील एक ते दोन दिवसांत ७५,००० ते १,००,००० वायल पाठवेल अशी अपेक्षा आहे. १५ मे किंवा त्याआधी आणखी एक लाख वायल पाठवेल. ईवा फार्मा सुरुवातीला अंदाजे १०,००० वायल पाठवेल आणि त्यानंतर दर १५ दिवसांनी किंवा जुलै पर्यंत ५०,००० वायल पाठवेल.
सरकारने देशातील रेमडेसिविरची उत्पादन क्षमता वाढविली आहे. २७ एप्रिल २०२१ देशांतर्गत सात परवानाधारक उत्पादकांची उत्पादन क्षमता दरमहा ३८ लाख वायलवरून वाढून १.०३ कोटी वायल झाली आहे. गेल्या सात दिवसात (२१-२८ एप्रिल, २०२१) औषध कंपन्यांनी देशभरात एकूण १३.७३ लाख वायालचा पुरवठा केला आहे. ११ एप्रिल रोजी दररोज ६८,९०० वायल इतका पुरवठा होत होता यात वृद्धी होऊन २८ एप्रिल २०२१ रोजी हा आकडा २.०९ लाख वायल इतका झाला. रेमडीसिविरचा पुरवठा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सल्ले-सूचना जारी केल्या आहेत.
भारतात रेमडीसिवरची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. सर्वसामान्य जनतेत हे इंजेक्शन परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे हे सुनिश्चित करण्यासाठी एनपीपीएने १७ एप्रिल २०२१ रोजी सुधारित किरकोळ किंमत जाहीर करत सर्व प्रमुख ब्रँडची किंमत प्रति वायल ३५०० रुपयांपेक्षा कमी केली.
