रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना त्यांच्याच रयत क्रांती संघटनेकडून मोठा दणका बसला आहे. रयत क्रांती संघटनेची रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त करत असल्याची माहिती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासणे यांनी गुरुवारी माध्यमांना दिली.
वर्षानुवर्षे अन्याय झालेल्या शेतमजूरांना सदाभाऊ खोत न्याय मिळवून देतील याच अपेक्षेने रयत क्रांती संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहिली. मंत्री खोत यांच्याकडे शेतमजूरांच्या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी आम्हाला कोणताही प्रतिसाद दिली नाही.
शेतमजूरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ही मागणी आमची होती. मंत्री खोत यांनी शेतमजूरांसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. सदाभाऊ खोत यांची कामकाज पध्दत पाहता भविष्यातही शेतमजूरांना न्याय मिळणार नाही अशी खात्री झाल्याने हि संघटना बरखास्त केल्याचे सासणे यांनी सांगितले.
