दिलासादायक! गणेशोत्सवासाठी मुंबईतून रत्नागिरीत आलेल्या फक्त ०.०२५ टक्के कोकणवासीयांनाच कोरोनाची बाधा
मुंबईतून आलेल्या केवळ २५ शतांश टक्के चाकरमान्यांनाच कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी गणेशोत्सवासाठी ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या काळात एक लाख २३ हजार ५१२ चाकरमानी कोकण रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांनी दाखल झाले. त्यापैकी ५५ टक्के म्हणजे ६७ हजार ५२६ जणांनी करोनाप्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेऊनच जिल्ह्यात प्रवेश केला, तर ४२ हजार ३७४ म्हणजे ३४ टक्के चाकरमान्यांनी कोकणात येण्यापूर्वी करोनाची चाचणी करून घेतली होती.
चाकरमानी आपापल्या गावी पोहोचल्यानंतर ग्राम सुरक्षा दलांमार्फत अवघ्या १३ हजार ६१२ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी केवळ ३५ जणांना करोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. गेल्या वर्षीपासून गणेशोत्सवासाठी कोकणात येऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांनी यावर्षी शिथिल झालेल्या निर्बंधांचा योग्य तो अर्थ घेतला. आपल्यापासून कोकणात करोनाचा फैलाव होणार नाही, याची दक्षता घेऊनच त्यांनी गावी येऊन गणेशोत्सव साजरा केला, हेच त्यातून सिद्ध झालं आहे.
