मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असाच संदेश आहे : राज ठाकरे
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची समिक्षा करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरे यांनी सभा घेतली. काळाचौकी येथील सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले.
या सभेमध्ये त्यांनी ‘मोदी है तो मुमकिन है’ या जाहीरातीची पोलखोल केली. या जाहीरातीमध्ये मोदींसोबत एका कुटुंबाचा फोटो दाखवला आहे. या संपूर्ण कुटुंबालाच राज ठाकरे यांनी मंचावर आणत भाजपाच्या जाहीरातीचे पितळ देशासमोर उघडे पाडले.
या कुटुंबाने भाजपाच्या जाहीरातीत काम केले नव्हते. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. भाजपाच्या आयटी सेलवाल्यांनी हा फोटो क्रॉप करुन मोदींच्या फोटोसोबत जोडला व ‘मोदी है तो मुमकिन है’ जाहीरातीसाठी वापरला. हे फक्त एक उदहारण आहे. अशा कितीतरी अजून अशा गोष्टी असतील. भाजपाच्या आयटी सेलकडून खोटया बातम्या पेरल्या जात आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी आणि उद्योजक उदय कोटक यांनी गेल्याच आठवड्यात दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्या उमेदवारीचे समर्थन केले होते. मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
तोच मुद्दा लक्षात ठेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी मिलिंद देवरांचे समर्थन केले. मुकेश अंबानी उद्धव ठाकरेंचे जिवलिग मित्र आहेत.
मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असाच संदेश आहे. आजपर्यंत एखाद्या उद्योगपतीने जाहीरपणे कोण्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्याचे मला तरी आठवत नाही, असेही राज यांनी नमूद केले.
