मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली रुग्णालयास भेट देत खारघर दुर्घटनेतील पीडितांची घेतली भेट
मुंबई, दि. १७: काल दिनांक १६ एप्रिल रोजी नवी मुंबई येथील खारघर येथील कार्यक्रमात ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे अधिकृतरित्या १२ लोकांचा मृत्यू झाला तर शंभर च्या वर लोकांना इस्पितळात भरती करण्यात आले. ज्यात प्रामुख्याने महिला व बालकांचा समावेश होता. घटनेनंतर विविध राजकीय पक्षांतील नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी काल रात्री एमजीएम रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देत उष्माघातामुळे बाधित झालेल्या रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी राज्य सरकार व विषेशतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
या सार्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमजीएम रुग्णालयास प्रत्यक्ष भेट दिलीच सोबत आज सकाळी ट्वीट करत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. आपल्या ट्वीट मध्ये ते म्हणाले की, “काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी.”
