केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते छत्तीसगडच्या रायपूर येथे ९,२४० कोटी रुपयांच्या ३३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
रायपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे ९,२४० कोटी रुपयांच्या ३३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

“या रस्ते प्रकल्पांमुळे छत्तीसगडला ओडिशा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांशी संपर्क करणे सुलभ होईल, असे गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.
राज्यातील मागास भागांना राज्याच्या विकसित भागांशी जोडण्यासाठी उत्तम रस्त्यांचे जाळे उपलब्ध होईल तसेच मुंगेली आणि कबीरधाम येथील सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे सोपे होईल, असेही ते पुढे म्हणाले.
“पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार, छत्तीसगडला समृद्ध करण्यासाठी आणि या राज्याचा विकास सुनिश्चित करण्यासाठी नियोजनबद्ध दिशेने वाटचाल करत आहे. या प्रकल्पांच्या बांधकामामुळे इंधन, प्रवासाचा वेळ, अंतर आणि एकूण वाहतूक खर्चात बचत होईल. यामुळे अनुपपूर-अंबिकापूर या कोळसा अवजड रेल्वे वाहतूक क्षेत्रावरील रस्ते वाहतूक सुरळीत होईल आणि अवजड तसेच मोठ्या वाहनांची वाहतूक सुरळीत होईल.” असे गडकरी यावेळी म्हणाले.
या प्रकल्पांमुळे उद्योगकेंद्रे, व्यावसायिक वाहन केंद्रे, खाणी, प्रस्तावित औष्णिक ऊर्जा केंद्रांपर्यंत सहजपणे प्रवेश करण्याचा मार्ग उपलब्ध होईल ,असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
