पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांचे विधानसभेत प्रतिपादन
मुंबई, दि.२३: कंपनीमार्फत होणाऱ्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल आणि याबाबत चौकशी केल्यानंतर हे सिद्ध होत असेल तर अशा कंपनीवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत दिली.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत मे. रॉयल कार्बन ब्लॅक कंपनीमार्फत होणाऱ्या प्रदुषणामुळे आरोग्याला धोका होत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य महेश बालदी, प्रशांत बंब यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.
पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले की, रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार या परिसरात श्वसन विकार, नेत्र रोग, त्वचा रोग इत्यादी रोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, ही रुग्णवाढ या कंपनीमुळे होत असलेल्या प्रदुषणामुळेच होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेले नाही. तरी सुद्धा याबाबत तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले.
