“…मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती आहे” धारावी श्रेयवाद प्रकरणी खा. राहुल शेवाळे यांची भाजपवर बोचरी टीका
मुंबई: जागतिक आरोग्य संघटनेने मुंबईत यशस्वी झालेल्या धारावी पॅटर्न ची प्रशंसा केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या यशात ज्याचं योगदान होतं त्या सर्वांचे आभार मानले. याच वेळी भाजप आमदार नितेश राणे व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं योगदान असल्याचा दावा केला व त्यानंतर श्रेयवादाचं राजकारण दोन्ही बाजूंनी सुरू झालं.
या श्रेयवादावर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काहीशी तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती आहे. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणी किती मेहनत घेतली, याची साक्ष धारावीतील जनताच देईल. मोठेपणा हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. उगीच नको त्या विषयात राजकारण करून जनतेच्या भावनांचा अनादर करणे विरोधकांना महागात पडेल. अशा कठीण प्रसंगात दिवसरात्र सरकारवर टीका करायची आणि चांगल्या कामगिरीच्या श्रेयासाठी रेटून खोटं बोलायचं, ही दुटप्पी भूमिका आहे. राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, डॉक्टर्स, मुंबई पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि धारावीची जनता यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याच प्रयत्नांची दखल घेऊन प्रशंसा केली आहे.” आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे लक्षणीय ठरेल.
