पुण्यात शस्त्रास्त्र, स्फोटकांचा मोठा शस्त्रसाठा जप्त, एक जण ताब्यात
पुणे: ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावात पाइप बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह तलवारी, भाले, कोयता, चिलखत यासारखी शस्त्र सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच दहशतवाद विरोधी पथकाने हा शस्त्रसाठा ताब्यात घेतला असून एका स्थानिक व्यक्तीकडे कसून चौकशी सुरू आहे.
पिंपळवंडी येथील अभंग वस्ती येथे राजाराम किसन अभंग (वय ६०) याच्या शेतातील पडक्या घरात हा शस्त्रसाठा सापडला आहे. राजाराम याच्याकडे ४ पाईप बॉम्ब बनविण्यासाठी तयार केलेले स्ट्रक्चर पाईप, २ इलेक्ट्रिक गन मशीन, गन पावडर, एका तेलकट कागदामध्ये गुंडाळलेले पावडर स्वरुपातील स्फोटक पदार्थ ,२ तलवारी, २ भाले, ५९ डेटोनेटर अशा स्वरूपात शस्त्रसाठा सापडल्याने तपास यंत्रणांची धावपळ उडाली आहे.
राजाराम अभंग हा मुळातच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याने २००३ मध्ये एका व्यक्तीला ठार मारण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात लहान मुलांसह महिला जखमी झाली होती. अभंग याला यावेळी अटकही झाली होती. तो जवळपास तीन वर्ष येरवडा कारागृहात होता. अभंग याचे कुटुंबीय त्याच्या सोबत राहत नाहीत. पुणे ग्रामीण पोलीस पथकाने ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी अभंग याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करत आहेत.
