जाणून घ्या प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि फळपीक विमा योजना नोंदणीत महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर आहे
पुणे, दि. २१: प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणी संख्येत महाराष्ट्राने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. राजस्थान पहिल्या, तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमाकांवर आहे. कृषी विभागाचे प्रमुख सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि फळपीक विमा योजनेसाठी एकंदर १ कोटी ७१ लाख २१ हजार ७६९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात प्रधानमंत्री पीक विम्यासाठीच्या अर्जांची संख्या १ कोटी ६९ लाख ४८ हजार ७९० आहे. इतर अर्ज फळपीक विमा योजनेसाठीचे आहेत. या सर्व अर्जांद्वारे १ कोटी १३ लाख ६७ हजार ६७१ हेक्टरवरील खरीप पिके आणि फळपिके संरक्षित झाली आहेत. शेतकऱ्यांनी एक रुपयांप्रमाणे १ कोटी ६९ लाख ५२ हजार ३८५ रुपये विम्यासाठी जमा केले आहेत. उर्वरित शेतकरी हप्ता आणि राज्याचा हिस्सा राज्य सरकार भरणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचा एकत्रित हप्ता ४ हजार ७५५ कोटी ३० लाख आणि केंद्राचा हिस्सा ३ हजार २१६ कोटी २८ लाख रुपये असेल. शेतकरी, राज्य आणि केंद्राची एकत्रित विमा हप्ता रक्कम ७ हजार ९७३ कोटी २७ लाख आहे, अशी माहिती आवटे यांनी दिली.
Source – AIR
