Priyanka Chaturvedi
राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांचा काँग्रेस ला टाटा, शिवसेनेच्या वाटेवर ?
लोकसभा निवडणुकांची दुसरी फेरी संपली पण अद्याप राजीनामे आणि पक्षांतर यांचे वारे काही थांबले नाहीत. कालच काँग्रेस च्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी स्वपक्षावर तोफ डागल्यानंतर आज त्यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे कळते. आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर पत्रकार परिषद आहे. बहुदा त्याच वेळी त्या शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करतील.
प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेस च्या प्रवक्तेपदी उत्तम प्रकारे काम केलेले आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्या कोब्रापोस्ट, तेहलका या माध्यमांसाठी स्तंभलेखन करायच्या. पण लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपविरोधी बोलण्यात त्या अग्रेसर राहिल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेत जर त्या प्रवेश करत्या झाल्या तर भाजप वर अंकुश ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो हे सेना नेतृत्वाने अचूक हेरले असावे.
