दाऊदला अटक करण्याची संधी शरद पवारांमुळे हुकली – प्रकाश आंबेडकर
मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतासमोर सरेंडर व्हायला तयार होता, मात्र शरद पवार यांच्यामुळे ही संधी हुकली, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
१९९३ च्या मुंबईत बाॅम्बस्फोट आणि दंगलीचा मस्टरमाइंड असल्याचा संशयित आरोपी दाऊद भारताला द्या अशी भीक मागणऱ्यांनी आता संधी गमावलेली आहे, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.
“आता ‘दाऊद द्या’ असं म्हणत पाकिस्तानकडे भीक मागायची वेळ आली आहे. शरद पवार यांनी प्रस्ताव का फेटाळला ? २०१५ पासून नरेंद्र मोदींचे भाजपा सरकार सत्तेत आहे तरी त्यांनी सुद्धा दाऊदला भारतात आणण्याचा प्रयत्न का केला नाही?”, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
