माउंटेड पोलीस दलात पुढील ६ महिन्यात ३० अश्व
बृहन्मुंबई माउंटेड पोलीस युनिटकरीता राज्य शासनाने 30 अश्व, 1 पोलीस उप निरीक्षक, 1 सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, 4 पोलीस हवालदार आणि 32 पोलीस शिपाई असे मनुष्यबळ मंजूर केलेले आहे. सध्या या युनिटमध्ये देशी व विदेशी 13 जातिवंत अश्व खरेदी करण्यात आले असून उर्वरित अश्व पुढील सहा महिन्यात खरेदी करण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई पोलीस दलाने माउंटेड पोलीस युनिट नव्याने सुरुवात करण्याचे आव्हान स्वीकारून, गेल्या चार महिन्यांत नवीन घोडे मिळवून पोलीस अंमलदारांना अश्वसोबत घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिलेले आहे. रेसकोर्स, हौशी रायडिंग क्लब आणि लष्कराच्या घोडदळातील 61 अनुभवी प्रशिक्षकांनी माउंटेड पोलीस युनिटमधील पोलीस अंमलदारांना घोडे पाळण्याची कार्यपद्धती व कौशल्याचे प्रशिक्षण दिले आहे.
माउंटेड पोलिसांचे फायदेः
घोडेस्वार पोलीसांना गर्दीच्या ठिकाणी उंचीचा फायदा मिळणार आहे. जमावाच्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे व गैरवर्तन करणाऱ्या व्यक्ती लक्षात येण्यास त्यांना मदत होईल. समुद्र किनारी असलेल्या गर्दीच्या ठिकाणी घोडागाडीपेक्षा माउंटेड पोलीसव्दारे प्रभावीपणे गस्त घातली जावू शकते. माउंटेड पोलीसच्या गस्तीचा सरासरी वेग हा पायी गस्त घालणा-या पोलीसांपेक्षा 7 ते 10 किमी अधिक आहे. औपचारिक परेडमध्ये सजवलेल्या अश्वांचा व रायडर्सचा समावेश केल्याने परेडची भव्यता तसेच आकर्षकता वाढते.
मरोळ येथे 2.5 एकरावर बांधणार तबेला
यावेळी पोलीस आयुक्त श्री. बर्वे यांनी माहिती दिली, मुंबई माउंटेड पोलीस युनिट करीता सशस्त्र पोलीस मरोळ मुख्यालय येथे 30 अश्वांकरीता कायमस्वरूपी तबेला बांधण्यासाठी 2.5 एकर जागा निवड केली आहे. या ठिकाणी रायडींग स्कुल, अश्वांकरीता स्विमिंग पूल, सॅन्ड बाथ, रायडर रुम, ट्रेनर रुम, फिड स्टॉक रुम बांधण्यात येणार आहेत. हे बांधकाम महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
माउंटेड पोलीस दलातील अश्वांना ने-आण करण्याकरीता हॉर्स प्लोटस्, ह़ॉर्स अॅम्ब्युलन्स खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच माउंटेड पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदारांना व अश्वांना शो जंपींग, टेन्ट पिगींग, पोलो, रेसींग माउंटेड पोलीस कर्तव्य मेळावा अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरीता उच्च प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हॉर्स माऊंटेड पोलीस रायडर कडे वॉकी- टॉकी देण्यात येणार असून जलद संपर्कासाठी त्याचा उपयोग होईल याशिवाय आवश्यक तेथील घटनांच्या व्हिडीओ रेकॉर्डींगसाठी ‘बॉडी माऊंटेड कॅमेरा’ सुद्धा दिला जाईल.
मुंबई पोलीस मुख्यालयात झळकणार दलाचा रेजिमेंटल फ्लॅग
मुंबई पोलीस दलाला 1954 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते रेजिमेंटल फ्लॅग (कलर) पहिल्यांदाच बहाल करण्यात आला होता. ध्वजाचा वापर मध्यंतरी करण्यात येत नव्हता. आता हा ध्वज यापुढे मुंबई पोलीस दलाच्या मुख्यालयात व विविध सशस्त्र मुख्यालयांमध्ये झळकविण्यात येणार आहे. ध्वजाची प्रतिकृती आयुक्त कार्यालयात दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यासाठी श्री. देशमुख यांच्या हस्ते मुंबई पोलीस दलाकडे पोलीस ध्वज सुपूर्द करण्यात आला.
