पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करू नये – शरद पवार
कोल्हापूर: माझी आई कोल्हापूरची असून ती शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारात वाढली आहे. त्यांचेच संस्कार आईच्या मार्फत माझ्यावर देखील झाले आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबीयांची चिंता करू नये, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिले. ते कोल्हापुरात आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.
वर्धा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी पवार कुटुंबात कलह सुरू असून पुतणे अजित पवार पक्षावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले,आमच्या कुटुंबावर बोलण्याऐवजी मोदींनी विदर्भतील दुष्काळ, शेतकरी आत्महत्येवर बोलावे.
अजित पवार हे उत्तम प्रशासक आहेत, ते जनतेच्या समस्या उत्तम प्रकारे सोडवतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा एकाचा नसून सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे, असा टोला देखील यावेळी पवारांनी मोदींना लगावला.
२०१९ मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटनेमध्ये बदल करून एकमताचा अधिकार उद्ध्वस्त करतील अशी भीती पवार यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी गांधी घराण्याच्या त्यागाचे व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचेही गोडवे गायले. ते म्हणाले की मोदी सत्तेत आल्यापासून सातत्याने गांधी परिवारावर वैयक्तिक रागातून टीका करत आहेत.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर गांधी परिवाराचं नाव उज्जवल करण्यासाठी आज राहुल गांधी हे नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून देशभर फिरत आहेत व त्यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
