मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना लिहिलेल्या धमकीच्या पत्राबाबत पनवेल व उरण पोलिसांकडून कसून तपास
पनवेल/उरण, दि.१४(विठ्ठल ममताबादे): मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अश्लील भाषेचा वापर करत जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र नुकतेच प्राप्त झाले. यानंतर तात्काळ महापौर पेडणेकर यांनी पत्र लिहिणाऱ्या व धमकी देणाऱ्या व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर पत्र पनवेल येथून प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती उघड झाली असून या प्रकरणी उरण पोलीस ठाण्याकडून कसून चौकशी सुरु आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणार्या पत्रावर म्हात्रे आडनाव, उरणचा पत्ता असून पनवेल पोस्टाचा शिक्का आहे. त्यामुळे उरण व पनवेल पोलीसांनी म्हात्रे आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींची चौकशी केली. या तपासात उदय केसरीनाथ म्हात्रे राहणार केगाव, उरण यांचीही चौकशी केली. उदय म्हात्रे हे एका नामांकित कंपनीत सिनियर एच. आर. मॅनेजर म्हणून काम करत आहेत. तसेच भाजपा उरण कामगार कायदे विषयक सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. त्यांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र उदय म्हात्रे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “माननीय किशोरीताई पेडणेकर यांना ज्या व्यक्तीने पत्र लिहिले त्याची आम्ही निंदा करतो. माझे नाव यात मुद्दामहून गोवले जात आहे. या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. माझी बदनामी सुरु आहे. जो कोणी अपराधी आहे किंवा पत्र लिहिणारा आरोपी आहे तो आरोपी त्वरित पकडला जावा अशी माझी मागणी आहे. माझा कोणत्याही प्रकारे त्या पत्राशी संबंध नसताना पोलीस प्रशासनाकडून मला फोन सुरु आहेत. त्यामुळे मला मानसिक त्रास झाला आहे.” त्या पत्राशी आपला कोणताही संबंध नाही असे स्पष्ट मत भाजप उरणचे कायदेविषयक सल्लागार उदय केसरीनाथ म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. हा सारा प्रकार खोडसाळपणामुळे झाल्याशी शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांचे मत आहे.
