अखेर पनवेल महानगरपालिकेचा ‘संपूर्ण’ लॉकडाऊनचा अजब फतवा मागे; काढला योग्य आदेश
पनवेल: पनवेल महानगरपालिकेतर्फे आज एका आदेशान्वये पालिका हद्दीत दि. ०३/०७/२०२० रोजी सायंकाळी ९.०० ते दि. १४/०७/२०२० रोजी सकाळी ५.०० वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या दहा दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक वस्तू व सेवा प्रदान करणारी दुकानं व अस्थापनं चालू राहणार आहेत. ज्यात प्रामुख्याने अन्न-धान्य(किराणा), भाजी, फळे, दूध यांची यांची विक्री करणारी दुकानं सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० दरम्यान चालू राहणार आहेत. तर रुग्णालय, वैद्यकीय सेवा व सुविधा पुरवणाऱ्या संस्था, दवाखाने तसेच औषधांची दुकानं २४ तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
काल पनवेल महानगरपालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये पालिका हद्दीतील नागरिकांना दोन दिवसांत(काल व आज) पुढील १० दिवस पुरेल इतका जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे व औषधे यांचा साठा करण्याचा अजब फतवा काढण्यात आला होता. यात एक विशेष बाब म्हणजे पनवेल महानगरपालिका हद्दीत संपूर्ण लोकडाऊन करणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. ज्यानंतर महाराष्ट्र वार्ता ने या जगावेगळ्या निर्णयाची चिकित्सा केली होती. आज अखेर ‘पनवेल मनपा’ने आपल्या आदेशात कालच्या निर्णयावरून यु-टर्न घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या पावलावर पाऊल ठेवत आदेश काढला. परंतु पनवेल मनपाच्या कालच्या फतव्यामुळे आज पनवेल पालिका हद्दीत अन्नधान्य, भाजी व फळांच्या दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यात नागरिकांनी कोरोनाच्या फिजिकल डिस्टनसिंग च्या नियमाला पायदळी तुडवले.
येत्या दहा दिवसांत होणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात मागील लॉकडाऊन-२/३ दरम्यान ज्या आस्थापनांना आपले कामकाज चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती त्यांनाच यावेळी परवानगी देण्यात आलेली आहे.
सविस्तर आदेश पहा :




