खारघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सेसकडून मेडिकल ऑफिसरला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची खुलेआम धमकी
खारघर/पनवेल: ज्या दिवसापासून देशात कोविड लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून पनवेल महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या न त्या कारणामुळे कायम चर्चेत राहिला आहे. प्रारंभी चर्चेत राहिला तो कोविडशी लढण्यास लागणाऱ्या साधनसामुग्रीच्या कमतरतेमुळे व नंतर चर्चेत राहिला कोविड सेंटर मधील बलात्कार प्रकरणामुळे. शिवाय एमजीएम सारख्या खाजगी रुग्णालयाला जादा पैसे दिल्याचे प्रकरण तर या सर्वांवर कडीच होती. काल दि. २० ऑक्टोबर रोजी खारघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका घटनेमुळे तर या शृंखलेत आणखी भर पडली आहे.
वरिष्ठ परिचारिकांबाबत तक्रारी
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीमकडे पनवेल महापालिकेच्या आखत्यारीत मोडणाऱ्या खारघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. या ठिकाणी कामास असणाऱ्या वरिष्ठ परिचारिकांकडून केल्या जाणाऱ्या हलगर्जीपणाची जंत्रीच समोर आली. या केंद्रावर जवळच्या तळोजे, नावडे, खारघर, कळंबोली व कामोठे परिसरातून कुत्रा चावल्यामुळे अँटी-रेबिज इंजेक्शन घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे रुग्ण येथे आल्यावर सध्या त्यांना एक ते दोन तास बाहेर ताटकळत थांबावे लागतेय. या दरम्यान येथील नर्सेसकडून रुग्णांकडे दुर्लक्षच केले जाते. बाहेर येऊन साधी विचारपूस करण्याची तसदिही घेतली जात नाही. मुळात श्वानदंशाच्या रुग्णांवर तात्काळ उपचार होणे अपेक्षित असताना अशी वागणूक जर मिळत असेल तर ही फार चिंतादायक बाब आहे. असाच अनुभव लसीकरणासाठी येथे आपल्या बालकांना घेऊन येणाऱ्या मातांना येतोय. शिवाय या आरोग्य केंद्रावर डॉक्टर्स विरुद्ध वरिष्ठ परिचारिका यांदरम्यान याच कारणांवरून वारंवार खटके उडत असून चक्क नळावरच्या भांडणांसारखा आवाज परिसरात घुमत असतो. याचं लाईव्ह दृश्य आमच्या एका प्रतिनिधीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं.
काल खारघरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमचे एक प्रतिनिधी येथे बराच वेळ पाळतीवर होते. आणि नेमकं याच दरम्यान अचानक एका नर्स चा डॉक्टरांसोबत मोठमोठ्याने भांडत असल्याचा आवाज बाहेर आला. यानंतर आमच्या प्रतिनिधीने आत शिरत ही घटना याची डोळा याची देही पाहिलीही आणि यातला छोटासा भाग हळूच कॅमेऱ्यात कैदही केला.
Video : हे आरोग्य केंद्र की भाजी मार्केट
सोबतच्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक महिला ज्या येथील सर्व नर्सेस च्या प्रमुख असून त्या या केंद्राच्या मुख्य मेडिकल ऑफिसर सोबत वाद घालत आहेत. दरम्यान यात अचानक तावातावाने एन्ट्री केलेल्या या दुसऱ्या नर्स महिलेने(ज्या ANM असल्याचे कळले) या डॉक्टरांना चक्क खोट्या गुन्ह्यांत गुंतवण्याची धमकी दिली. वाद क्षुल्लक विषयावरचा असूनही त्यात ही नर्स उर्मटपणे म्हणतेय की, “…..मी पण सांगेन की त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला”. हे दृश्य पाहून आमच्याकडे आलेल्या तक्रारींची खातरजमाच झाली. कोविड च्या या कठीण काळात डॉक्टर्स हे देवदूत बनून दिवसाचे २०-२० तास आपले कर्तव्य बजावत आहेत. अशावेळी त्यांचा कनिष्ठांकडून वारंवार अपमान होणे ही नक्कीच पनवेलकरनांसाठी भूषणावह बाब नाही.
कुठल्याही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खांद्यावर रुग्णांवर वेळेत उपचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी असते आणि अशा ठिकाणीच जर बेजबाबदार नर्सिंग स्टाफची नियुक्ती केली गेली असेल तर रुग्णांचे हाल रामभरोसेच म्हणावेत. सध्यातरी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख या व अशा इतर प्रकरणांबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. नाहीतर एमजीएम व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयांवर कारवाई करण्यासाठी पनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल कडू यांना प्रशासनाकडे वेगळी तक्रार दाखल करण्याची वेळ आली नसती.
खारघर UPHC प्रकरणी दोषी परिचारिकांवर पनवेल महानगरपालिकेकडून तात्काळ कठोर कारवाई होणे गरजेचे आहे नाहीतर अशा घटनांवर भविष्यात आळा बसणार नाही व मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेलाही यश मिळणार नाही.
