“वाढवण बंदर प्रकल्प जनतेच्या विरोधाला डावलून होऊ देणार नाही” – मंत्री अस्लम शेख
पालघर: पालघर जिल्ह्यातल्या प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिक जनतेचा असलेला विरोध डावलून हा प्रकल्प होऊ देणार नाही असं बंदर विभागाचे मंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात अस्लम शेख यांनी एक ध्वनीचित्रफित प्रसारित करून आपली भूमिका मांडली.
यात त्यांनी राज्य सरकार स्थानिकांसोबत आहे, असं म्हटल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार १९९६ साली डहाणू तालुका पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर केलं होतं.
या प्रस्तावित बंदरामुळे जर इथल्या जैवविविधतेचं आणि स्थानिकांच्या पारंपरिक रोजगाराचं नुकसान होणार असेल, तर सरकारही स्थानिकांच्या संघर्षात त्यांच्या सोबत असेल असं शेख यांनी म्हटलं आहे. प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असून, तो दर्शवण्यासाठी अलिकडेच वाढवण बंदर विरोध संघर्ष समितीनं किनारपट्टीच्या सर्व गावांमधे बंदही पाळला होता.
Source – AIR
