Ambulance Pak
पाकिस्तानला भारताच्या सर्जिकल स्ट्राईकची भीती; सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा भागात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची सर्व स्तरावर कोंडी केली आहे. त्यातच भारताने आपल्या लष्कराला युद्धाचे पुर्ण अधिकार दिले आहेत. पुलवामाचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल अशी भूमिका भारत सरकारने घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये सैन्याच्या हालचालींना वेग आला आहे.
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची चिन्हं असल्यामुळे जास्तीजास्त रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी सज्ज रहा. खाजगी रुग्णालयातील २५ टक्के बेड सैनिकांसाठी राखीव ठेवा. जखमी सैनिकांचे वेळीच उपचार होतील याची काळजी घ्या. अशा माहितीचे पत्र पाकिस्तान लष्करानं देशभरातील सर्व रुग्णालयांना लिहिले आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर राहणाऱ्या नागरिकांनी रात्री कामाव्यतिरिक्त घरात लाईट सुरू ठेवु नये. लोकांनी नियंत्रण रेषेजवळील रस्त्यांचा वापर रहदारीसाठी करू नये असा इशाराही पाकिस्तान सरकारने दिला आहे.
दरम्यान पाकिस्तान लष्करानं क्वेटाच्या जिलानी रुग्णालयाला लिहलेल्या पत्रात असे लिहले आहे की, भारताशी युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेत त्यानुसार पूर्व सीमेवर युद्ध झाल्यास क्वेट्टा लॉजिस्टिक परिसरात सिंध आणि पंजाबमधील सिव्हिल किंवा लष्कर रुग्णालयातून जखमी जवानांना येथे पाठवले जाईल तसेच प्राथमिक उपचारानंतर त्या जवानांना बलुचिस्तान येथील सिव्हिल रुग्णालयात हलवले जाईल.
पाकिस्तान सरकारने सर्व प्रकारे तयार राहण्याचे आदेश दिल्यानंतर आता पाकच्या सीमेवरील भागात बंकर बनवण्याचे काम सुरू झाल्याचे कळते. भारताने पाकिस्तानची आर्थिक आणि राजकीय पातळीवर नाकेबंदी केली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातही पाकिस्तानला एकटं पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करेल अशी शक्यताही यावेळी वर्तवली जाते आहे.
