आम्ही भाडेकरू नाही तर हिस्सेदार आहोत; ओवैसी यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलीस-ए-इतेहादुल मुसलमिन(एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. एका सभेदरम्यान ते म्हणाले की, “जर कोणी असं समजत असेल की हिंदुस्तानचे (वजीर-ए-आजम) पंतप्रधान ३०० जागा जिंकल्यामुळे, हिंदुस्थानावर मनमानी करतील, तर ते आम्ही होऊ देणार नाही. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की संविधानाचा हवाला देत, असदुद्दीन ओवैसी आपल्याबरोबर लढेल, असहाय्यांच्या न्यायासाठी लढेल.”
मक्का मस्जिद येथे झालेल्या सभेत ओवैसी म्हणाले की भारतात पुन्हा एकदा भाजप चं सरकार आल्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही. भारताचा कायदा आणि संविधान आपल्याला या गोष्टीची मान्यता देतो की आपण आपल्या धर्मानुसार जीवन जगू शकतो. कोणत्या पक्षाच्या येण्याने कोणतंच अंतर येत नाही. भारताला आबाद राहायचं आहे आणि आम्ही त्याला आबाद ठेवू. आम्ही येथे बरोबरीचे आहोत, भाडेकरू नाही आहोत आणि हिस्सेदार राहू.
असे मानले जाते की तीन दिवसांपूर्वी संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेल्या अल्पसंख्याकांच्या उल्लेखावर असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
