माजी मंत्री छगन भुजबळ यांची मागणी
मुंबई, दि. १३: अवकाळी पासवामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना त्याबद्दल कोणतीही घोषणा होत नाही, तर छ. संभाजीनगर येथे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असताना शेतकरी आत्महत्या ही रोजचीच आहेत, त्यात नवीन काय, असे वक्तव्य राज्याच्या कृषिमंत्र्यांनी केले. त्यामुळे कृषिमंत्री अतिशय संवेदनाहीन आहेत अशी जहाल टीका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. शेतकऱ्यांवरचा खर्चाचा भार हा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मागे दोनशे आणि आता शंभर वाढवले यावरून कसलाही हिशोब लागू शकत नाही. शेतकऱ्याला कांदा उत्पादनात बाराशे रुपये क्विंटल खर्च येतोय, मात्र शेतकऱ्यांना पाचशे-सातशे रुपये हाती येतात. त्यामुळे करोडो रुपये खर्च करणाऱ्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना निदान पाचशे रुपये तरी अनुदान द्यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. ही मागणी पूर्ण न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत, असा संताप व्यक्त करत त्यांनी सभात्याग केला.
