नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नाशिक, दि. १७: केंद्र सरकारनं एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडच्या माध्यमातून राज्यातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी आज नाशिकमध्ये ही माहिती दिली. देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी करणार असल्याचं चंद्रा यांनी सांगितलं. नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू केली आहे. आतापर्यंत एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत अंदाजे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. एनसीसीएफनं दोन लाख ८९ हजार ८४८ मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिकमध्ये नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवणार असल्याचं चंद्रा यांनी बातमीदारांना सांगितलं.
एनसीसीएफच्या वतीनं ग्राहकांच्या फायद्यासाठी दिल्ली, कोलकाता, पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नाशिक अशा ११४ शहरांमध्ये १ हजार १५५ मोबाइल व्हॅनद्वारे २५ रुपये किलोनं कांदा विक्री सुरू केली आहे. कांदा, गव्हाचं पीठ, डाळीपाठोपाठ एनसीसीएफतर्फे मूगडाळ आणि तांदूळदेखील अत्यल्प दरात विक्री करणार असल्याचं चंद्रा यांनी सांगितलं.
Source – AIR
