“….तर रात्रीची संचारबंदी लावा” – ‘ओमिक्रोन च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची राज्यांना सूचना
मुंबई: कोविड संसर्गाचा दर दहा टक्क्यांपेक्षा वाढल्यास, संबंधित जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी तसंच अन्य निर्बंध लावण्याची सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना केली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, कोविड स्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले असून, जिल्हापातळीवर कोविडचे नवे रुग्ण आढळत असल्यास, प्रतिबंधित क्षेत्र निर्धारित करण्यासारख्या पर्यायांचाही विचार करावा, असं म्हटलं आहे.
एखाद्या जिल्ह्यात संसर्ग दर वाढला, तर सखोल निरीक्षण आणि स्थानिक पातळीवर विलगीकरणाची सज्जता ठेवावी, असंही या पत्रात म्हटलं आहे. संसर्ग दर अधिक असलेल्या भागात लग्न समारंभ आणि अंत्यसंस्कारांसाठी संख्येची मर्यादा घालण्याचे निर्देशही या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
