नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांना गृहमंत्रालयाची नोटीस, पंधरा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. यावर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांना आज नोटीस पाठविण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पाठवण्यात आलेल्या या नोटीसमध्ये म्हटलंय की “राहुल गांधी यांचं नाव एका ब्रिटीश कंपनीच्या कागदपत्रांमध्ये सापडलं असून या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी हे ब्रिटीश नागरीक असल्याची तक्रार मिळाली आहे, या तक्रारीवर राहुल गांधी यांनी अधिक खुलासा करावा.”
सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती. मंगळवारी गृहमंत्रालयाने या तक्रारीच्या आधारे राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.अमेठीमध्ये त्यांचा सामना भाजपच्या नेत्या स्मृती इराणींसोबत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात मैदानात उतरल्या होत्या, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
