उत्तर भारतातल्या अनेक राज्यात थंडीची लाट
उत्तर भारतातल्या अनेक राज्यात थंडीची लाट आली आहे. राजधानी दिल्लीत किमान तापमानाचा पारा तीन अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. मध्य प्रदेशात सर्वत्र बोचरे गार वारे वहात असल्याने नागरिक घरात किंवा शेकोटीच्या उबेमध्ये बसणं पसंत करत आहेत.
जम्मू काश्मीर, लेह, लडाख भागात हाडे गोठवणारी थंडी असून श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे चार तर कमाल तापमान आठ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. लेहमध्ये किमान तापमान उणे १५ आणि कमाल तापमान उणे १ अंश सेल्सिअस आहे.
देशातल्या इतर अनेक भागात किमान तापमान सरासरीच्या १ ते ३ अंश कमी असून ही परिस्थिती निदान पुढचे दोन दिवस अशीच राहणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातल्या अनेक रेल्वे गाड्या धुक्यामुळे रद्द होत असल्या, तरी हिमवृष्टीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी उत्तर रेल्वे एक ते ३१ जानेवारी दरम्यान लखनौ ते चंडीगढ आणि जम्मूतवी पर्यंत विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे.
