’सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत नवी मुंबईतील विविध विभागांत लोकसहभागातून स्वच्छता उपक्रम
नवी मुंबई, दि. १०: ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ या स्वच्छता आणि आरोग्याचा परस्पर संबंध अधोरेखित करणा-या राष्ट्रीय अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत सर्व विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील सहा.आयुक्तांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक हे अधिनस्त कर्मचारी आणि स्वच्छताकर्मींच्या सहयोगाने स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधात्मक विविध उपक्रम राबवित आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमात मुले आणि युवकांना तसेच नागरिकांना सहभागी करून घेत लोकसहभागावर भर दिला जात आहे.
यामध्ये बेलापूर विभागात बहुउद्देशीय सर्वधर्मीय सामाजिक सेवा मंडळ तसेच ज्येष्ठ नागरिक संघ बेलापूर यांच्या सहयोगाने बेलापूर विभाग कार्यालयामार्फत विश्वनाथ महाराज समाधी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच, प्लास्टिक प्रतिबंधाबाबत जनजागृती करून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. कालही नागपंचमीच्या श्रावणातील सणानिमित्त दिवाळेगाव येथील जगन्नाथेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणा-या महिला व नागरिकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगून कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त शशिकांत तांडेल व स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे आणि त्यांच्या सहका-यांनी या उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले.
अशाच प्रकारे नेरूळ विभागातील नमुंमपा शाळा क्र. १०२ याठिकाणी विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त डॉ. अमोल पालवे आणि स्वच्छता अधिकारी अरूण पाटील यांनी आपल्या सहकारी, अधिकारी व स्वच्छताकर्मी यांच्या सहयोगाने सखोल स्वच्छता मोहीम राबविली तसेच स्वच्छता आकाशकंदील स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन अभिनंदन केले. यावेळी प्लास्टिकचा वापर टाळून कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याविषयी जनजागृतीही करण्यात आली. कोपरखैरणे विभागात सहा.आयुक्त सुनिल काठोळे व स्वच्छता अधिकारी राजूसिंग चौहान यांच्या नियंत्रणाखाली महापालिका व एनएमएमटी कर्मचारी आणि स्वच्छताकर्मी यांच्या एकत्रित सहभागातून कोपरखैरणे बस डेपो याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्वच्छता, प्लास्टिक प्रतिबंधाची शपथही घेण्यात आली.

तुर्भे विभागातही सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे यांच्या नियंत्रणाखाली उपमुख्य स्वच्छता अधिकारी संजीव शेकडे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील आणि सहकारी कर्मचारी व स्वच्छताकर्मी यांच्या उपस्थितीत जलाशयांची सखोल स्वच्छता ही विशेष मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. यामध्ये एमआयडीसी क्षेत्रातील खोकड तलाव, तुर्भेगाव तलाव, कोपरी तलाव यांच्या जलाशयांची व परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली.
त्याचप्रमाणे काल नमुंमपाचे साफसफाई कर्मचारी, कचरा वाहतुक कर्मचारी, शौचालय स्वच्छता कर्मचारी यांच्या दैनंदिन स्वच्छता कामातील कौशल्यवाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आले व लोकांमध्ये कचरा वर्गीकरण, कच-याची विल्हेवाट, प्लास्टिकची दैनंदिन वापरातून हद्दपारी या स्वच्छताविषयक बाबींची जनजागृती त्यांच्यामार्फत क्षेत्रीय पातळीवर करण्याचे सूचित करण्यात आले.
ऐरोली विभागातही विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त अशोक अहिरे व उपमुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली पोस्ट ऑफिस याठिकाणी अंतर्गत व बाह्य परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये पोस्ट ऑफिस मधील कर्मचारीही उत्साहाने सहभागी झाले होते. महानगरपालिकेने पुढाकार घेऊन ही मोहीम राबविल्याबद्दल पोस्टामार्फत कौतुक करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियानात विविध उपक्रम राबविण्यात येत असून अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखालील या उपक्रमांमध्ये नवी मुंबईकर नागरिकांचा उत्साही सहभाग लाभत आहे.
