नवी मुंबई महापालिकेचा अभिनव उपक्रम: कंटेनमेंट झोन मधील गणरायासाठी ‘श्री गणेशमूर्ती संकलन वाहन’
नवी मुंबई, दि.२२: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून साजरा होत असलेल्या श्रीगणेशोत्सवात नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा जाणवू नये व कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्यवस्थितरीत्या अंमलबजावणी व्हावी या दोन्ही गोष्टींकडे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे विशेष लक्ष असून त्यादृष्टीने विसर्जनप्रसंगी होणार गर्दी टाळण्यासाठी २३ मुख्य विसर्जन तलावांच्या जोडीला १३५ कृत्रिम विसर्जन तलाव विभागवार निर्माण करण्यात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील ३७ तिसऱ्या प्रकारच्या प्रतिबंधित क्षेत्रांमधील(Containment Zone-३) नागरिकांच्या गणेशोत्सवातील श्रीमूर्ती विसर्जन सुविधेच्या दृष्टीने कंटेनन्मेट झोनच्या प्रवेशद्वाराजवळ मूर्ती संकलन व्यवस्थ करण्यात आलेली आहे.
या मूर्ती संकलन व्यवस्थेमध्ये अधिक भर घालत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कंटेनमेंट झोन मधील मूर्ती संकलनासाठी ‘श्री गणेशमूर्ती संकलन वाहन’ कार्यरत ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक विभागातील ‘कंटेनमेंट झोन’ मध्ये ‘श्री गणेश मूर्ती संकलन वाहन’ कार्यरत असणार असून हे वाहन होऊन मध्ये फिरवून नागरिकांच्या घराजवळून श्रीमूर्ती संकलित करतील व त्यांचे विधीवत विसर्जन करतील. तरी विशेषत्वाने कंटेनमेंट झोन मधील नागरिकांनी याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विसर्जना पूर्वीची निरोपाची आरती घरीच करून आपल्या गणेश मुर्ती महानगरपालिकेच्या मूर्ती संकलन वाहनावरील स्वयंसेवकांकडे द्याव्यात असे आवाहन आहे.
श्रीगणेशोत्सवाचा उत्साह कायम राखून प्रत्येक नागरिकाने आरोग्य भान जपावे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका राबवित असलेल्या विविध सोयी सुविधांचा लाभ घ्यावा आणि आपले नवी मुंबई शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी योध्याची भूमिका साकारावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
