नवी मुंबई महानगरपालिका आंतर विभाग पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न
नवी मुंबई, दि. २८: नवी मुंबई महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असणारे अधिकारी व कर्मचारी यांनी शारीरिक व मानसिक तणावापासून मुक्त रहावे, तसेच त्यांच्यामध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या क्रीडा व कला गुणांना वाव मिळावा यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने वर्धापनदिनाचे औचित्य साधून आंतरविभाग कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते.
अशा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सध्याच्या सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटच्याही स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. यातील पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागांतील ३८ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा शुभारंभ मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांच्या हस्ते, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्तललिता बाबर, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या स्पर्धेत उपांत्य फेरीची लढत अग्निशमन विभाग विरुध्द कोपरखैरणे विभाग यांच्यात अटीतटीची झाली. यामध्ये कोपरखैरणे विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १६ धावा केल्या. अग्निशमन विभागास विजयासाठी असलेली १७ धावांची त्यांनी ७ चेंडू राखून पूर्ण करीत विजयश्री मिळविली व ते अंतिम फेरीत दाखल झाले. दुसरी उपांत्य फेरी आपती व्यवस्थापन विभाग विरुध्द वाहन चालक यांच्यामध्ये होऊन वाहनचालक संघाने ६ धावांनी विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पुरूष क्रिकेटची अंतिम फेरी अग्निशमन विभाग व वाहन चालक यांच्यात होऊन अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये अग्निशमन विभागाने दिलेले ३६ धावांचे आव्हान वाहन चालक संघाला पूर्ण करता येऊ शकले नाही. वाहनचालक संघाला २० धावांमध्ये रोखत १६ धावांनी विजय संपादन करत अग्निशमन विभागाने अंतिम विजेतेपद पटकावले. अशाच प्रकारे महिला विभागासाठी घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये उपांत्य फेरीत माध्यमिक शिक्षक विभाग विरुध्द समाजविकास विभाग यांच्यामध्ये लढत होऊन समाजविकास विभागाने २२ धावांचे दिलेले लक्ष्य माध्यमिक शिक्षक विभाग संघाला पूर्ण करता येऊ शकले नाही. त्यांना १७ धावांवर रोखत समाजविकास विभाग ५ धावांनी विजयी झाला. दुसरी उपांत्य फेरी शहर अभियंता विभाग विरुध्द शिक्षण विभाग यांच्यामध्ये होऊन या चुरशीच्या सामन्यात शिक्षण विभागाने २ धावांनी विजय संपादन केला.
महिला क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत विजयी झालेल्या शिक्षण विभाग व समाजविकास विभाग या दोन्ही संघांच्या अंतिम फेरीतील चुरशीच्या लढतीत समाजविकास विभाग संघाला ३१ धावांमध्ये रोखत शिक्षण विभाग संघाने २ धावांनी विजय संपादन केला व महिला क्रिकेटचे अंतिम विजेतेपद पटकावले. पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात संपन्न झाल्या.
