अक्षय पाटील ठरला ‘नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री’ किताब चा मानकरी
नवी मुंबई, दि. ११: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध क्रीडा व कला स्पर्धांचे आयोजन करून नवी मुंबईतील खेळाडू व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. यामध्ये शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी १९९५-९६ पासून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा’ आणि ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ विष्णुदास भावे नाटयगृहात उत्साहात संपन्न झाल्या. राज्यभरातील विविध जिल्हयांतून आलेल्या २०० हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
‘नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा’ यामध्ये ठाणे पश्चिम जिल्हयाच्या आशुतोष साहा याने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ हा प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. ठाणे जिल्हयातील चेतन नाईक याने उपविजेतेपद संपादन केले. ठाणे पश्चिम जिल्हयाच्या संतोष यादव याने ‘मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर’ किताब तसेच ठाणे पश्चिम जिल्हयाच्या छेवंग लामा यांनी ‘रनर अप’ किताब मिळविला.

या राज्यस्तरीय स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात कोल्हापूरचा प्रतिक मगदूम, ६० किलो वजनी गटात ठाणे पश्चिम जिल्हयाचा संतोष यादव, ६५ किलो वजनी गटात ठाणे पश्चिम जिल्हयाचा नितीन म्हात्रे, ७० किलो वजनी गटात मुंबई जिल्हयाचा प्रतिक पांचाळ, ७५ किलो वजनी गटात मुंबई जिल्हयाचा संदीप सावळे, ८० किलो वजनी गटात कोल्हापूर जिल्हयाचा ऋषिकेष वगरे, 85 किलो वजनी गटात ठाणे पश्चिम जिल्हयाचा आशुतोष साहा व ८५ किलोवरील वजनी गटात ठाणे जिल्हयाचा चेतन नाईक यांनी प्रथम पारितोषिके संपादन केली. प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे ६ सहा विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
त्याचप्रमाणे ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ यामध्ये वाशी येथील अक्षय पाटील याने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ हा प्रथम क्रमांकाचा चषक संपादन केला. वाशीच्याच निखील आंबोरे याने उपविजेतेपद पटकाविले. स्पर्धेतील ५० किलो वजनी गटात ऋषिकेश सावंत, ५५ किलो वजनी गटात अनिकेत खरात, ६० किलो वजनी गटात मयुर म्हात्रे, ६५ किलो वजनी गटात अक्षय पाटील, ७० किलो वजनी गटात निखील आंबोरे, ७५ किलो वजनी गटात धीरज पाटील अशाप्रकारे विविध वजनी गटांत प्रथम पारितोषिके संपादन केली. प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे ५ विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त ललिता बाबर, माजी खासदार संजीव नाईक, माजी नगरसेवक जी. एस. पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव तसेच शरीरसौष्ठव क्षेत्रातील मान्यवर चेतन पगारे, प्रशांत आपटे, राजेंद्र चव्हाण, विक्रम रोठे, हेमंत खेबडे उपस्थित होते. नवी मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंना उत्तेजन मिळावे व त्यांना राज्यभरातील इतर शरीरसौष्ठवपटूंकडून प्रेरणा मिळावी या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका राज्यस्तरीय श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे १९९५ पासून आयोजन करीत असून त्यामध्ये नवी मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंसाठी स्वतंत्र स्पर्धा घेऊन त्यांना उत्तेजन देण्याचे काम करीत आहे. यामध्ये नवी मुंबईसह राज्यभरातील २०० हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेत स्पर्धा यशस्वी केल्या.
