रॉबिनहूड फेम मनसे नेते नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
मुंबई: आपल्या हटके अंदाजाने अडचणीत असलेल्या सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी थोड्याच वेळापूर्वी हातावर शिवबंधन बांधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
मनसेने संध्याकाळी उशिरा आपल्या ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली ज्यात नितीन नांदगावकर यांचे नाव नव्हते. या नंतर थोड्याच वेळात नितीन नांदगावकर यांनी मातोश्री गाठत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी युवासेना सरचिटणीस वरूण सरदेसाई उपस्थित होते. नितीन नांदगावकरांचा शिवसेना प्रवेश मनसेसाठी मोठा धक्का मनाला जातोय. मनसेत त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. लोकसभा निवडणुकां आधी मुंबई पोलिसांतर्फे त्यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची बाजू भक्कमपणे न घेतल्यामुळे ते नाराज होते असे त्यांचे निकटवर्तीय म्हणतात.
नितीन नांदगावकर कोणत्या विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणार हे आद्यप गुलदस्त्यात आहे. पण ते शिवसेनेच्या स्टार प्रचारकांपैकी एक असतील हे मात्र नक्की.
