पीपीई किट आणि इतर खर्च लावून केली जात होती रुग्णांची लूट
मुंबई, दि. १५: कोरोना हा विषाणू रोग नसून पैसे कमावण्याचे साधन झालं आहे अशी भावना ठेवत मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात रुग्णालयांनी नागरिकांची लूट सुरु केली असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. खासगी रुग्णालयाकडून उपचार शुल्काच्या नावाखाली वसुली सुरु असल्याचा एक प्रकार मुंबईच्या ताडदेव भागात असणाऱ्या भाटिया हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. शिवसेनेचे अँग्री सुपरमॅन नितीन नांदगावकर यांनी फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून हा पोलखोल केला आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार तर केले जातात परंतु उपचाराच्या नावाखाली रुग्णांची बक्कळ लूटमार होत असतानाच, या रुग्णालयांनी रुग्णांकडून अजून पैसे उकळण्यासाठी पीपीई किटचा आडोसा घेतला आहे.
ताडदेव येथील ललित छाया या ५३ वर्षीय गृहस्थांची कोविड चाचणी पॉझिटिव्हआल्याने दिनांक ६ जून २०२० रोजी ते भाटिया खासगी रुग्णालयात दाखल झाले. ललित छाया यांना दिनांक २३ जून २०२० रोजी डिस्चार्ज देण्यात आला. दिनांक २ जून ते २३ जून या एकूण १७ दिवसात जेवढे पीपीई किट वापरले गेले त्यांचे एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचे देयक रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या हातात थोपवले. वास्तविक पाहता, एक पीपीई किट घालून डॉक्टर २० रुग्णांची तपासणी करतात, परंतु या एका पीपीई किट चे पैसे त्या २० रुग्णांच्या देयकात पीपीई किट ची जास्त संख्या दाखवून वसूल केले जातात. भाटिया रुग्णालय प्रशासन इतकेच करून थांबले नाहीत तर पीपीई किट सोबतच सॅनिटायझेशन, हाऊसकिपींग, डॉक्टर आणि नर्सच्या जादा कामाचे वेतन आणि पीपीई किट ची विल्हेवाट लावण्यासाठी जो खर्च येतो तो सगळा खर्च त्यांनी ललित छाया यांच्या देयकात जोडला. एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचे देयक हे फक्त त्यांच्या पीपीई किटचे देयक असून, गोळ्या औषध यांचा इतर खर्च हा रुग्णालय प्रशासनाकडून वेगळा आकारण्यात आला आहे. अश्या प्रकारे खासगी रुग्णालयांमध्ये गोरगरिबांची लूटमार सुरु आहे. मुळात राज्य सरकारने खाजगी रुग्णालयांना रुग्णाकडून उपचाराचे किती पैसे घ्यायचे याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पण तरीही खाजगी रुग्णालयांकडून लुटीचे प्रकार चालूच आहेत.
नेमका कसा होतो ‘पीपीई किट’ चा झोल
एक पीपीई किट साधारण ५०० ते १००० रुपयांना खरेदी केले जाते. हा खर्च रुग्णांकडून वसूल करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात डॉक्टर एकच पीपीई किट घालून बरेच तास काम करतात. या दरम्यान किमान २० रुग्णांची तपासणी केली जाते. असे असताना, खासगी रुग्णालयांनी एका पीपीई किट चा खर्च २० रुग्णांकडून वसूल करणे अपेक्षित आहे. मात्र एका पीपीई किटचा खर्च रुग्णांना दिल्या जाणाऱ्या देयकांमध्ये वेगवेगळ्या रकमा टाकून वसूल केला जात आहे. ही लूट एवढ्यावरच थांबली नाही. पीपीई किट सोबतच सॅनिटायझेशन, हाऊसकिपींग, डॉक्टर आणि नर्सच्या जादा कामाचे वेतन आणि पीपीई किट ची विल्हेवाट लावण्यासाठी जो खर्च येतो तो सगळा खर्च रुग्णांच्या देयकांमध्ये जोडला जातो.कोरोना रुग्णांना गाफील ठेवून त्यांच्या देयकांच्या माध्यमातून विविध प्रकारचे खर्च रुग्णांकडून वसूल केले जात आहे.