“ठेवीवरचं विमाकवच वाढवण्याच्या निर्णयामुळे ग्राहकांना न्याय मिळाला” – नितीन गडकरी
मुंबई, दि.१२: बँका बुडित निघाल्यावर ग्राहकांच्या बँकांमधल्या ठेवीवरचं १ लाखाचं विमाकवच वाढवून ५ लाख रुपये करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानं, बँक ग्राहकांना न्याय मिळाला असल्याचं केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित ठेवीदार वीमा कार्यक्रात बोलत होत.
बँकामध्ये विश्वासानं पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांच्या अधिकारांचं संरक्षण करणं हाच केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच केंद्रसरकारनं हा निर्णय घेतला. आपल्या भविष्याचं नियोजन करून बँकांमध्ये आपली बचत ठेवणाऱ्या देशभरतल्या असंख्य गरीब, मध्यमवर्गीय, छोट्या ठेवीदारांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा लाभ होईल असं ते म्हणाले.
याअंतर्गत आज अनेक सहकारी बँक ग्राहकांना ६८ कोटी ७ लाख रुपयांचा परतावा दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या विमाकवचासाठीचा प्रिमीअम बँकाच भरणार आहेत, या प्रिमीअमचा ग्राहकांवर बोजा पडणार नाही, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं. या विमाकवचाअंतर्गत ग्राहकांना परतावा देण्यासाठी अधिक वेळ लागू नये याकरता, अशी प्रकरणं तीन महिन्यांमध्ये निकाली काढायची तरतूदही सरकारनं केली आहे.
कायद्यातली ही सुधारणा सहकारी बँकांसोतच, राष्ट्रीय आणि खाजगी बँकांनाही लागू असल्याचं त्यांनी सांगितलं. बँका बुडीत निघाल्यानं नुकसान झालेल्यांच्या व्यथांचे आपले अनुभवही गडकरी यांनी यावेळी सांगितले. बँका या विश्वासावर चालतात, आणि विश्वास हेच येत्या काळातलं मोठं भांडवल आहे असं ते म्हणाले.
भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे, त्यामुळेत यापुढे कोणीतीही बँक बुडीत निघू नये हाच केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. यावेळी गडकरी यांनी कायद्यातल्या या दुरुस्तीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभारही मानले. या तरतुदीचे १६० लाभार्थीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Source-AIR
