काँग्रेस कार्यकर्तेही माझ्याबरोबर, म्हणतात तुम्हीच बाजी मारणार – नितीन गडकरी
नागपूर: नागपुरातील एका जाहीर प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस कार्यकर्तेही आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांचे मला समर्थन असून ते फोन करून मला पाठिंबा देत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून माझ्या विजयाबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही विश्वास आहे. काँग्रेस कार्यकर्ते भलेही माझा प्रचार करत नसले तरी ते मनाने माझ्यासोबत आहेत, असेही गडकरी म्हणाले.
विरोधी पक्षावर किंवा त्यांच्या उमेदवारावर मी टीका करणार नाही. कार्यकर्त्यांनीदेखील टीकाटिप्पणी करू नये, असे देखील गडकरी म्हणाले.
गडकरींच्या या वक्तव्यामागे काँग्रेसमधील गटबाजी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. नागपूरमध्ये यंदा गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये रंगतदार सामना होणार आहे.
