जाणून घ्या रायगड जिल्ह्यातील उगवता निरव मोदी घोटाळेबाज मंगेश पाटील याच्या ‘AMP ग्रुप’ नामक कंपनीबाबत
खोपोली/रायगड: एम.एल.एम., चिटफंड्स, कमी वेळात गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवणाऱ्या योजनांच्या जंजाळात सध्या मध्यमवर्ग, निवृत्तीधारक, वृद्ध व विधवा स्त्रिया मोठ्या प्रमाणात गुंतत चालले आहेत. आम्ही महाराष्ट्र वार्ता तर्फे या योजना चालवणाऱ्या कंपन्यांचे पितळ उघडे पाडूनही त्यांच्यासमोर वस्तुस्थिती आणूनंही यात लोकं अडकत चालली आहेत. रायगड जिल्ह्यातील खोपोली सारख्या छोट्या शहरातही हे लोण वेगाने पसरत चाललं आहे. या ठिकाणी अशीच एक स्कीम चालवणाऱ्या कंपनीचा भांडाफोड आज आम्ही “ऑपरेशन ब्लॅक मार्ट” या घोटाळेबाजांचा पर्दाफाश करणाऱ्या ‘महाराष्ट्र वार्ता’ च्या विशेष मोहिमे आखत्यारीत आपल्यासमोर करणार आहोत.
गेल्या काही वर्षांपासून AMP ‘ए.एम.पी.’ नामक एम.एल.एम. कम गुंतवणूक कंपनीने रायगड जिल्ह्यात विशेषतः खोपोली, कर्जत, पनवेल परिसरात धुमाकूळ घातला आहे. एव्हाना प्रत्येक खोपोली-कर्जतकरांच्या परिचयाच्या कोणा न कोणा व्यक्तीने यात पॆसे गुंतवले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. या अवैध व्यवसायाचा प्रमुख मंगेश वा. पाटील (रा. खोपोली), आदिश र. पाटील आणि आणखी एकाने मिळून २०१८ साली ‘AMP डायरेक्ट’ नावाने घोटाळेबाज कंपनी सुरु केली. (तत्पूर्वी २०१४ साली त्यांनी ‘एएमपी सक्सेस लाईफ नेटवर्क मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड’ नावानेही एक कंपनी स्थापन केली होती.) ‘एएमपी डायरेक्ट’ मार्फत ते लोकांकडून आलेल्या पैशांवर शेअर ट्रेडिंग करत असल्याचे तसेच ई – कॉमर्स व हॉटेल – रिसॉर्ट व्यवसायात सदर गुंतवणूक करत असल्याचे आम्हाला गुंतवणूक दारांकडून कळले. सध्या या कंपनी ने लॉकडाउन सुरू झाल्यापासून शेकडो लोकांना परतावा देणे बंद केले आहे. या संदर्भात ‘महाराष्ट्र वार्ता’च्या आपली समस्या टीम कडे काही गुंतवणूकदारांनी आपली व्यथा मांडली. ज्यात फार धक्कादायक माहिती समोर आली. मंगेश पाटील व त्याची टीम ही सदैव त्यांच्या स्कीम बदलत असल्याचे आमच्या विशेष प्रतिनिधीला सखोल संशोधन केल्यावर जाणवले. खुद्द मंगेश पाटील ने स्वतःहाच नवीन स्कीम ची तपशीलवार माहिती खोटं ग्राहक बनलेल्या आमच्या गुप्त प्रतिनिधीला फोनवर सांगितली. दरम्यान ‘AMP डायरेक्ट’ च्या जाळ्यात फसलेल्या गुंतवणूकदारांकडून आम्ही त्याने दिलेल्या आधीच्या स्किमबाबत तपशीलवार माहिती जाणून घेतली. चला तर पाहुयात आधीची ही स्कीम नेमकी होती तरी कशी.

मेंबर : “तूम्ही या कंपनीच्या स्कीम मध्ये जेव्हा १ लाख ५ हजार रुपये गुंतवता, तेव्हा जागेवरच तुम्हाला एकूण रकमेच्या ३० टक्के इतक्या मूल्याचं सोनं दिलं जातं जे सहा महिन्यांनंतर कंपनी तुमच्याकडून परत घेते. यानंतर तुम्हाला पुढील २० महिन्यांसाठी दरमहा एकूण गुंतवणुक मूल्याच्या ९ टक्के रक्कम उत्पन्न म्हणून दिली जाते. (ज्यात ५ टक्के – मुद्दल आणि ४ टक्के – उत्पन्न असते). याचसोबत जो एजेंट हा मेम्बर देतो त्याला मेंबरने गुंतवलेल्या रकमेच्या ४ टक्के कमिशन मिळते. तसेच पुढेही काही काळ कमिशन मिळत राहते. यानंतर काही महिन्यांनी मंगेश पाटील आणि टीम ने स्कीम मध्ये बदल करत परतावा कमी केला.” आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि सरकारी, सहकारी ते अगदी खाजगी बँकाही वार्षिक ७ ते ७.५० टक्के परतावा व्याज स्वरूपात देत असताना यांना बरं महिना ४ टक्के म्हणजेच वार्षिक ४८ टक्के परतावा देणे कसे काय जमते? अशा कोणत्या व्यवसायात बरं हे पैसे गुंतवतात? यावर त्यांचं उत्तर तयार असतं ते म्हणजे आम्ही शेअर मार्केट, तसेच इतर व्यवसायात गुंतवणूक करून मोठा नफा कमावतो. हि झाली त्यांची बाजू. पण एवढा मोठा परतावा अगदी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करूनही मिळू शकत नाही. हे मोठ्यात मोठे व्यवसाय तज्ञही मान्य करतात. नाहीतर टाटाने गाड्या विकण्याचा व्यवसाय, गोदरेज ने साबण विकण्याचा व्यवसाय आणि रिलायन्स च्या अंबानींनी मोबाईल सेवा, तेलशुद्धीकरण प्रकल्प असे उद्योग करण्याची तसदी घेतली नसती.

मार्च महिन्यात जागतिक महामारीमुळे सबंध देशभर लॉकडाऊन लागू झालं आणि नोकरी, उद्योग, व्यवसाय सार्यांवर निर्बंध आले. याकाळात घोटाळेबाज मंगेश पाटील, आदिश पाटील आणि टीम ने लोकांना ठरल्याप्रमाणे दर महिन्याला पैसे देणे बंद केले. या सार्या फसव्या योजनांमध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचे फोन उचलण्यासही ही मंडळी सध्या टाळाटाळ करत असल्याचे आम्हाला काही गुंतवणूकदारांनी सांगितले. जेव्हा आमच्या गुप्त प्रतिनिधीने मंगेश पाटील ला बनावट ग्राहक बनत संपर्क केला तेव्हा त्याने आपण आता महाड येथे प्लॉटिंग ची स्कीम तसेच रोख स्वरुपात केलेली गुंतवणूक २४ महिन्यांत दुप्पट करण्याची योजना सुरू केल्याचे सांगितले.
खोपोलीतील मंगेश पाटील व चौकडीच्या AMP या नेटवर्क मार्केटिंग व्यवसायात रेल्वे खाते अशा आस्थापनातील सरकारी कर्मचारी, जमिनी विकून त्याचा मोबदला मिळालेले भूमिपुत्र, सेवा निवृत्त ज्येष्ठ नागरिक, गृहिणी ते अगदी रिक्षावाले अशांनी पैसे गुंतवल्याचे आमच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आले.
या घोटाळ्यात गंडलेल्या लोकांनी आपली व्यथा सांगताना सदर प्रकरणी शिवसेनेचे फायर ब्रँड नितीन नांदगावकर यांच्याशी आपण आमची भेट घालून द्यावी अशी मागणी केली. यावर आमच्या वरिष्ठांना नितीन नांदगावकर यांनी सांगितले की सध्या ते लुटारू हॉस्पिटल्सना धडा शिकवण्याच्या मोहिमेवर आहेत. त्यामुळे या प्रकरणी भविष्यात कोणाही गरिबाची फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेट घालवून देण्याचा शब्द दिला.
लॉकडाऊन आधी मंगेश पाटील व टीम मोठमोठ्या हॉटेल मध्ये राजरोस मार्केटिंग शिबिरं भरवत होती. या ठिकाणी जॅग्वार, ऑडी सारख्या गाड्यांमध्ये मिरवून आपल्या श्रीमंतीचं खोटं प्रदर्शन भरवत रोज नवनवीन गिर्हाईकं तेव्हाही गळाला लावत होते आणि आताही लावत आहेत. कर्जतमध्ये तर एक असाही एजंट आहे ज्याच्या ८० गुंतवणूकदारांना ‘AMP डायरेक्ट’ ने पैसे देणे बंद केल्यावर त्याने स्वतःच्या खिशातून पैसे द्यायला सुरुवात केली आहे. या बातमीनंतर या ठगांचे बिंग फुटणारंच आहे पण मग या सर्व गुंतवणूकदारांचे पैसे आता मंगेश पाटील व टीम ची संपत्ती विकुनच वसूल करायला हवेत.

काही महिन्यांपूर्वी मंगेश पाटील ने कर्जत भागात जमीन तसेच लोणावळा येथे आलिशान हॉटेल घेतले असल्याचे कळते. हे एवढं प्रकरण आम्ही समोर आणलं पण स्थानिक रायगड पोलीस, राज्य आर्थिक गुन्हे शाखा व विशेष म्हणजे ई.डी. (सक्तवसुली संचालनालय) स्वतःहून याबाबत अद्याप कोणतीच कारवाई का करत नाही हे मोठं कोडं आम्हाला पडलं आहे. गेल्या वर्षी वाशी, नवी मुंबई येथे ‘कॅपिटल ट्रेड’ नावाने असेच लोकांना देशोधडीला लावायचे उद्योग काही लोकांकडून चालू होते. परंतु पोलिसांच्या निदर्शनास आणल्यावरचं धाड टाकून हे बंद करण्यात आले. या महाठगांनी याआधीही अनेक MLM योजना चालवल्या असून त्या सर्व योजनांचा तपासही ‘ईडी’ व राज्याच्या ‘आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने’ अग्रक्रमाने सुरू करणे गरजेचे आहे. मंगेश पाटील व टीम ने आतापर्यंत काही शे कोटींची उलाढाल केली असून हे सर्व व्यवहार संशयास्पद वाटूनही आयकर विभाग, पोलीस प्रशासनाने याकडे कानाडोळा करणे अनाकलनीय वाटते. आम्हाला पोलीस प्रशासनाला विचारावेसे वाटते कि तुम्ही माध्यमांनी अशा घोटाळ्यांकडे लक्ष वेधून घेण्याची वाट का पाहता? आधीच कारवाई का करत नाही? असो पण आता ‘टीम महाराष्ट्र वार्ता’ या अशा घोटाळेबाजांची यादीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना समक्ष देणार आहे. तसेच अशा प्रकारे सामान्य माणसांची फसवणूक करणाऱ्यांसाठी येत्या अधिवेशनात जन्मठेपे सारखा कायदा संमत करण्याची थेट मागणी करणार आहे. जेणे करून मंगेश पाटील, आदिश पाटील आणि टोळीसारख्या घोटाळेबाजांना आयुष्यभराची अद्दल घडेल.

जर तुमचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा. तसेच अशा MLM स्कीम/ योजना आपल्या अवतीभवती कोठे चालू असतील तर या बाबत आपण आम्हाला ९३७२२३६३३२ या क्रमांकावर WhatsApp किंवा news@maharashtravarta.com वर कळवू शकता.
